संस्था परिचय

टिळकनगर विद्यामंदिर    18-Jan-2022
Total Views |
 
about
 
 
एखादी संस्था किती काळ कार्यरत आहे हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ती संस्था ज्या कारणासाठी स्थापन झाली, तिचे निर्वहन कशा प्रकारे पार पडले आहे, यावर त्या संस्थेची यशस्विता अवलंबून असते. या दोन्ही निकषांवर पूर्णपणे उतरणारी आणि संस्थेच्या घटनेत म्हटल्याप्रमाणे मराठी माध्यमाची शाळा चालवणे, या कार्यात स्वतःला वाहून घेतलेली संस्था म्हणजे डोंबिवलीचे टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ.
 
या प्रदीर्घ कालावधीमध्ये डोंबिवलीत अनेक प्रथितयश विद्यार्थी घडविणारी शाळा म्हणून टिळकनगर शाळेने आपला लौकिक कायम राखला आहे. वेळोवेळी संस्थेचे नेतृत्व करणारे सदस्य तसेच मुख्याध्यापक आदींनी शाळेला उत्तुंग यशाच्या शिखरावर नेले.
 
बाहेर समाजात सर्वत्र मराठी शाळा हा चिंतेचा विषय असताना आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा, सीबीएससी, आयसीएससी शाळा यांनी प्रचंड आव्हान उभे केलेले असताना टिळकनगर शाळेच्या ना कधी पटसंख्येवर परिणाम झाला, ना तुकड्या कमी कराव्या लागल्या, ना दर्जा घसरला. याचं महत्वाचं कारण म्हणजे संस्थेनी केलेले समयोचित बदल व सुधारणा !
 
१९९३ पासूनच शाळेत संगणक प्रशिक्षणाची सोय व्यवस्था केली गेली. सेमी इंग्रजी पध्दतीचा अवलंब सुरुवातीला इयत्ता आठवीपासून तर या वर्षीपासून इयत्ता पहिलीपासून करण्यात आला. अन्यत्र मराठी शाळा ओस पडत असतांना संस्थेने शाळेसाठी अत्यंत आधुनिक अशी नवी इमारत बांधली. या वर्षी ती इमारत पूर्ण झाल्यावर त्यात विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा कशा देता येतील. याचा विचार करण्यात आला. त्यासाठी आजी-माजी शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, पालक, माजी विद्यार्थी यांच्याशी चर्चा करण्यात आली.
 
या चर्चेतून, वैचारिक देवाण घेवाणीतून एक योजना आकाराला आली. उन्नयन आणि अनुशासन याद्वारे नियोजनबध्द वाटचाल असं या योजनेला म्हणता येइल. विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा कोणत्या पुरवाव्यात, यावर चर्चा होउन ई-लर्निंग सुविधा, सीसीटीव्ही, प्रशासकीय कामकाज सोपे करणारे सॉफ्टवेअर, विद्यार्थी विमा आदी अनेक बाबींचा अंतर्भाव झाला. आज अनेक शाळांमध्ये अशा सुविधा आहेत, परंतु टिळकनगर शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे ई-लर्निंग सुविधा केवळ १-२ ऑ​डिओ व्हिज्युअल रूम तयार न करता सर्व १८ खोल्यांमध्ये प्रोजेक्टर, स्क्रीन, स्पीकर्स आदी सुविधा देण्यात आल्या. ५४ सीसीटीव्हींनी शाळेचा संपूर्ण परिसर सुरक्षित झाला आहे.
 
संस्थेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा अपघात विम्याच्या छत्राखाली आहे. केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांसाठी हे कवच संस्थेने पुरवले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची सर्व माहिती कम्प्युटरवर उपलब्ध असावी, परीक्षेचा निकाल, वार्षिक नियोजन, दैनंदिन कामकाज यासाठी आवश्यक प्रशासकीय सॉफ्टवेअरचा वापर सुरू झाला आहे. पालकांशी थेट एसएमएसद्वारे संवाद सुरू झाला. प्रत्येक विद्यार्थ्यांची फाइल करण्यास सुरुवात झाली.
 
केवळ या सुविधा पुरवून संस्था थांबली असे नाही तर विद्यार्थ्यांची सर्वांगीण उन्नती व्हावी, यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. इंटरनॅशनल ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडसाठी शिक्षकांचे प्रशिक्षण, एक लाख पुस्तकांचे विद्यार्थ्यांसाठीचे प्रदर्शन अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा विकास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
टिळकनगर संस्था आणखी एक गरूडझेप घेण्याच्या तयारीत आहे. जून २०१६ मध्ये संस्थेच्या एमआयडीसी येथील वास्तूमध्ये पंचकोषाधारित गुरूकुल पध्दतीची शाळा सुरू केली जाणार आहे. ज्ञानप्रबोधिनी (पुणे) यांनी सुरू केलेला हा उपक्रम एक आदर्श शैक्षणिक प्रकल्प समजला जातो. सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशा संपूर्ण दिवसभर ही शाळा असेल. सकाळी योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, प्रार्थनानंतर न्याहारी, ९ वाजेनंतर ते दुपारी १ वाजेपर्यंत शालेय अभ्यास, जेवणानंतर स्वयंअध्ययन, छंदवर्ग, सायंकाळी खेळाचे प्रशिक्षण व मैदानी सांघिक खेळ असा भरगच्च कार्यक्रम असणारी शाळा हा अत्यंत महत्वाचा व महत्वाकांक्षी प्रकल्प मराठी (सेमी इंग्रजी) माध्यमातून जून महिन्यापासून कार्यान्वित होइल.
 
अशा सर्व आघाड्यांवर एकाच वेळी खंबीरपणे आणि दीर्घकालीन विचार करून मराठी माध्यमाच्या शाळांसमोर एक रोल मॉडेल उभे करणे हे संस्थेच्या कार्यकारी मंडळाने बघितलेले स्वप्न लवकरच सत्यात उतरलेले दिसेल, असा विश्वास कार्यकारी मंडळाला वाटतो.